Hot Posts

6/recent/ticker-posts

सासवडच्या अजय गणेशोत्सव मंडळाचे सुवर्ण महोत्सवी वर्ष म. ए. सो. बाल विकास मंदिर शाळेने केले अथर्वशीर्ष पठण सासवड प्रतिनिधी:बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: सासवड येथील अजय सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे हे सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे. त्यानिमित्ताने मंडळाने विविध उपक्रमांचे नियोजन केले आहे. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या बाल विकास मंदिर शाळेतील विद्यार्थ्यांनी गणपती उत्सवाचे औचित्य साधून अजय गणेशोत्सव मंडळात सामुदायिक अथर्वशीर्ष पठण केले.म. ए. सो. बाल विकास मंदिर शाळेतील विद्यार्थ्यांनी सासवड येथील श्री अजय सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात जाऊन या ठिकाणी अकरा वेळा अथर्वशीर्ष पठण केले. त्यानंतर सामुदायिक आरती झाली. विद्यार्थ्यांनी गणपतीची गाणी म्हटली. या उपक्रमात इयत्ता तिसरी, चौथीचे ३५० विद्यार्थी, शिक्षक सहभागी झाले होते. शाळेचा हा उपक्रम गेल्या चौदा वर्षांपासून अखंडपणे सुरु आहे. श्री अजय सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे हे सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे. त्यानिमित्त मंडळाने वृंदावन चा सुंदर देखावा सादर केला आहे. वर्षभर मंडळाकडून विविध सामाजिक उपक्रम घेतले जातात. गरजू महिलांना आर्थिक हातभार लावण्यासाठी मदत केली जाते तसेच पानवडी येथे गो शाळा सुरू केली आहे. बारामती विभागातून मंडळाला सामाजिक कार्याबद्दल प्रथम क्रमांकाचे पारितोषिक देऊन गौरविण्यात आले आहे अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष प्रवीणशेठ पवार यांनी दिली. दरवर्षी गणपती उत्सवाच्या अगोदर विद्यार्थी शाळेत दररोज अथर्वशीर्ष म्हणण्याचा सराव करतात आणि सुस्पष्ट उच्चारासह विद्यार्थी अथर्वशीर्ष पाठांतर करतात. एवढेच नव्हे तर शाळेतील विद्यार्थी आपल्या घराशेजारी राहणाऱ्या इतर शाळेतील विद्यार्थ्यांना देखील अथर्वशीर्ष म्हणायला शिकवतात. यामुळे इतर विद्यार्थ्यांचे देखील अथर्वशीर्ष पाठांतर झाले आहे.या उपक्रमासाठी शाळेचे मुख्याध्यापक भाऊसो बडधे यांचे मार्गदर्शन लाभले. यावेळी, श्री अजय सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाकडून मुख्याध्यापक , शिक्षक यांचे श्रीफळ देऊन स्वागत करण्यात आले तसेच विद्यार्थ्यांना अल्पोहार देण्यात आला होता. मुख्याध्यापक भाऊसो बडधे, अजय गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष प्रविण पवार , नरेंद्र महाजन, माणिक शेंडकर, दिपक कांदळकर, नितीन ठोंबरे, स्वाती बोरावके, अश्विनी कदम, राणी गिरमे, राजगौरी जगताप, वृषाली राजपुरे, सविता काळे ,मंडळाचे कार्यकर्ते आदी यावेळी उपस्थित होते. या उपक्रमाचे शाला समितीचे अध्यक्ष ॲड. सागर नेवसे महामात्र प्रा. सुधीर भोसले यांनी कौतुक केले आहे.

Post a Comment

0 Comments