Hot Posts

6/recent/ticker-posts

भारतीय शिक्षण मंडळ, पश्चिम महाराष्ट्र प्रांतातर्फे शिवचरित्रकार गजाननराव मेहेंदळे यांना विनम्र श्रद्धांजली संशोधनात सत्यनिष्ठा व जिज्ञासा जपण्याचा मेहेंदळे यांचा आदर्श – मा. प्रदीप रावत सासवड प्रतिनिधी : बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: भारतीय शिक्षण मंडळ, पश्चिम महाराष्ट्र प्रांतातर्फे महान इतिहास संशोधक आणि शिवचरित्रकार स्वर्गीय गजानन भास्कर मेहेंदळे यांना विनम्र श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. हा कार्यक्रम एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठ, पुणे येथे पार पडला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक एसएनडीटी गृहविज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गणेश चव्हाण यांनी केले. “संशोधनाच्या प्रत्येक क्षेत्रात सत्याचा शोध आणि तथ्याधारित दृष्टिकोन जोपासणाऱ्या गजाननराव मेहेंदळे यांच्या कार्याची ओळख प्रत्येक संशोधकास व्हावी, या उद्देशाने हा कार्यक्रम आयोजित केला आहे,” असे प्रतिपादन त्यांनी केले. प्रमुख वक्ते माननीय प्रदीप दादा रावत यांनी आपल्या प्रभावी भाषणात सांगितले की, “इतिहास म्हणजे केवळ घटनांचा अभ्यास नव्हे, तर सत्याच्या शोधाची प्रक्रिया आहे. शिवचरित्र समजून घ्यायचे असेल तर गजाननराव मेहेंदळे यांचा अभ्यास आवश्यक आहे. त्यांनी व्याख्याने वा सत्कारांपासून दूर राहून आयुष्यभर संशोधनाची अखंड साधना केली. ते आयुष्यभर विद्यार्थी राहिले आणि शिकण्याची अखंड प्रेरणा दिली. संशोधन करताना जिज्ञासा कधीही मरू देऊ नका, हा त्यांचा संदेश आजही तितकाच प्रेरणादायी आहे.” गजाननराव मेहेंदळे यांचे शिष्य डॉ. केदारनाथ फाळके यांनी त्यांच्या संशोधन प्रवासातील अनेक अनुभव व नोंदींच्या अचूकतेसाठी केलेल्या प्रयत्नांचे जिवंत उदाहरणांसह वर्णन केले. “खऱ्या इतिहासाचे वस्तुनिष्ठ चित्र समाजासमोर मांडण्यात मेहेंदळे यांचे योगदान अमूल्य आहे,” असे त्यांनी सांगितले. विशेष उपस्थिती म्हणून मा. रवींद्र शिंगणापूरकर (अधिसभा सदस्य, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ) यांनी सांगितले की, “संशोधन करायचे असल्यास मेहेंदळे यांना आदर्श मानावा. त्यांच्या जिज्ञासेची व तळमळीची परंपरा प्रत्येक संशोधकाने जोपासावी.” कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय अजेय धाक्रस (अखिल भारतीय सहव्यवस्था प्रमुख, भारतीय शिक्षण मंडळ) यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हटले की, “आजच्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या (AI) युगात नैसर्गिक बुद्धिमत्ता (NI) जोपासणे आवश्यक आहे. संशोधन हे केवळ पदवीसाठी नव्हे, तर समाजहितासाठी असले पाहिजे. समाजाभिमुख संशोधनातूनच विकसित भारताची निर्मिती होईल.” या प्रसंगी भारतीय शिक्षण मंडळ पश्चिम महाराष्ट्र प्रांताध्यक्ष प्रा. आर. एम. चिटणीस यांचीही उपस्थिती लाभली. कार्यक्रमाचे संचालन डॉ. वेदांत कुलकर्णी यांनी केले. याप्रसंगी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथील अधिष्ठाता प्रा. तांबट, एसएनडीटी पुणे परिसर समन्वयक प्रो. शितल मोरे, डॉ . महेश कोलतमे, डॉ बाळू राठोड, डॉ. भास्कर इगवे, डॉ सारिका बहिरट व एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठ, पुणे येथील विविध विभाग प्रमुख, प्राचार्य, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments