सर्वांगीण विकासासाठी सक्षम समाजरचना – खेळ, आरोग्य, शिक्षण आणि जबाबदार नागरिकत्व सासवड प्रतिनिधी:बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: आजच्या आधुनिक युगात समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी केवळ आर्थिक प्रगती पुरेशी नसून शारीरिक, मानसिक, बौद्धिक आणि सामाजिक विकास तितकाच महत्त्वाचा आहे. गाव पातळीपासून शहरापर्यंत प्रत्येक ठिकाणी नागरिकांना योग्य सुविधा उपलब्ध असणे ही काळाची गरज बनली आहे. विशेषतः विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी खेळ, आरोग्य, शिक्षण, संस्कार आणि योग्य जीवनशैली यांचा समतोल साधणे अत्यंत आवश्यक आहे.सर्वप्रथम, खेळाच्या सुविधा या प्रत्येक गाव, वस्ती आणि शहरात उपलब्ध असायला हव्यात. मैदान, जिम, तालीम, वॉकिंग ट्रॅक यांसारख्या मूलभूत सुविधा नसतील तर नागरिकांचे आरोग्य चांगले कसे राहील? कबड्डी, क्रिकेट, फुटबॉल, कुस्ती ,अॅथलेटिक्स, बॅडमिंटन, टेबल टेनिस, वॉलीबॉल, जिम्नॅस्टिक, कराटे , ज्युडो,बास्केटबॉल, योगासने तसेच मैदानी आणि इनडोअर खेळ, बुद्धिबळ इत्यादी तसेच ध्यान धारणा यासाठी स्वतंत्र जागा आणि प्रशिक्षक (coaching) उपलब्ध असणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर सुदृढ राहते, आत्मविश्वास वाढतो, टीमवर्कची भावना विकसित होते आणि तणाव कमी होतो. त्यामुळे प्रत्येक शाळा, महाविद्यालय आणि स्थानिक प्रशासनाने खेळाच्या सुविधा उभारण्यावर भर दिला पाहिजे.आरोग्यदायी जीवनशैलीसाठी स्वच्छता हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. जर रहिवासी भागात सांडपाण्याचा योग्य निचरा होत नसेल, कचरा जागोजागी साचत असेल, तर नागरिकांचे आरोग्य धोक्यात येते. अशा परिस्थितीत रोगराई वाढते आणि जीवनमान खालावते. त्यामुळे स्वच्छता व्यवस्थापन, कचरा वर्गीकरण आणि सांडपाणी निचरा यावर विशेष लक्ष दिले पाहिजे. “स्वच्छ गाव – निरोगी गाव” ही संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्था, प्रशासन आणि नागरिकांनी एकत्रित प्रयत्न करणे गरजेचे आहे.आज समाजासमोर एक गंभीर समस्या म्हणजे व्यसनाधीनता आहे. दारू, सिगारेट, तंबाखू आणि ड्रग्स यांचा वाढता वापर तरुण पिढीला दिशाहीन करत आहे. यावर कठोर नियंत्रण ठेवणे अत्यावश्यक आहे. उत्पादन, विक्री आणि वापर यावर कडक निर्बंध घालूनच आपण समाजाला या विळख्यातून बाहेर काढू शकतो. यासाठी शासनाने कठोर कायदे लागू करावेत आणि त्यांची काटेकोर अंमलबजावणी करावी. त्याचबरोबर जनजागृती मोहिमा राबवून नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करणेही तितकेच महत्त्वाचे आहे.तंत्रज्ञानाच्या युगात मोबाईल आणि स्क्रीन मीडिया हा विद्यार्थ्यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग झाला आहे. परंतु त्याचा अतिरेक हा धोकादायक ठरत आहे. मुलांच्या हातात मोबाईलचा जास्त वेळ वापर होत असल्याने त्यांच्या शारीरिक हालचाली कमी झाल्या आहेत, तसेच मानसिक आरोग्यावरही परिणाम होत आहे. स्क्रीनवर येणारा अयोग्य आणि धोकादायक कंटेंट त्यांच्या मनावर वाईट परिणाम करतो. त्यामुळे पालकांनी आणि शासनाने अशा कंटेंटवर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. डिजिटल साक्षरता वाढवून योग्य वापराची जाणीव करून देणेही महत्त्वाचे आहे.विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी केवळ शैक्षणिक अभ्यासक्रम पुरेसा नसतो. वक्तृत्व, गायन ,पोवाडा , लोक गीत गायन,वादन, नाट्य, चित्रकला आणि इतर कला-कौशल्यांचा, व्यावसायिक कौशल्यांचा विकास करणे आवश्यक आहे. यामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढतो, व्यक्तिमत्त्व खुलते आणि सर्जनशीलता विकसित होते. प्रत्येक शाळा आणि महाविद्यालयात अशा उपक्रमांसाठी सुविधा आणि प्रशिक्षक उपलब्ध असायला हवेत.आज ग्रामीण भागात एक चिंताजनक चित्र दिसून येते. वयोवृद्ध लोक शेती आणि कष्टाची कामे करत आहेत, तर युवक आणि विद्यार्थी मोबाईलमध्ये, comfort मध्ये व्यस्त आहेत. ही परिस्थिती समाजासाठी धोकादायक आहे. विद्यार्थ्यांनी समाज विकासाच्या कामात सहभागी होणे आवश्यक आहे. ग्रामस्वच्छता, वृक्षारोपण, जलसंवर्धन, साक्षरता अभियान यांसारख्या उपक्रमांमध्ये त्यांचा सहभाग वाढवणे गरजेचे आहे. अनेक कृषी, लघु व कुटीर उद्योग याचे प्रशिक्षण,विकास ,जोपासना यामुळे त्यांच्यात सामाजिक जबाबदारीची भावना निर्माण होईल.शिक्षणाच्या बाबतीत देखील गंभीर समस्या आहे. शाळेत अभ्यासक्रम पूर्ण केला जातो, परंतु विद्यार्थ्यांना त्यातील ज्ञान दीर्घकाळ लक्षात राहत नाही. सामान्य ज्ञानाची कमतरता दिसून येते. याचे मुख्य कारण म्हणजे विद्यार्थ्यांचा अभ्यासाकडे आत्मीयतेने पाहण्याचा अभाव. केवळ परीक्षेसाठी अभ्यास केला जातो, ज्ञानासाठी नाही. मार्क्स महत्वाचे आहेतच . पण फक्त मार्क्सनाच महत्व आले आहे.त्यामुळे शिक्षणपद्धतीत,आणखी सुधारण , बदल करून अनुभवाधारित आणि कौशल्याधारित शिक्षणावर भर देणे आवश्यक आहे.वेळेचे नियोजन ही देखील एक महत्त्वाची गोष्ट आहे. अनेक विद्यार्थ्यांना वेळेचे योग्य नियोजन करता येत नाही. त्यामुळे अभ्यास, खेळ आणि इतर उपक्रम यामध्ये समतोल राखता येत नाही. शाळा आणि पालकांनी विद्यार्थ्यांना वेळ व्यवस्थापनाचे महत्त्व समजावून सांगणे आवश्यक आहे.कुटुंब नियोजन हा देखील समाजाच्या विकासाचा महत्त्वाचा भाग आहे. एका कुटुंबात एक किंवा दोन मुले असणे हे आदर्श मानले जाते. यामुळे पालकांना मुलांकडे अधिक लक्ष देता येते आणि त्यांचा विकास योग्य पद्धतीने करता येतो. यामुळे समाजात संसाधनांचे योग्य वाटप होऊन जीवनमान सुधारते.वरील सर्व बाबींची अंमलबजावणी करण्यासाठी प्रशासन आणि नेतृत्वाची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. स्थानिक नेते, शासकीय अधिकारी आणि धोरणकर्त्यांनी या प्रश्नांकडे गांभीर्याने पाहिले पाहिजे. योग्य नियोजन, निधी आणि अंमलबजावणी यामुळेच या सुविधा प्रत्यक्षात येऊ शकतात. नागरिकांचा सहभाग आणि सहकार्य याशिवाय हे शक्य नाही.शेवटी, एक सक्षम, निरोगी आणि प्रगत समाज निर्माण करण्यासाठी सर्व घटकांनी एकत्रित प्रयत्न करणे आवश्यक आहे. खेळ, आरोग्य, स्वच्छता, शिक्षण, संस्कार आणि जबाबदार नागरिकत्व यांचा समतोल साधूनच आपण उज्ज्वल भविष्य घडवू शकतो. प्रत्येक नागरिकाने आपली जबाबदारी ओळखून समाजाच्या विकासासाठी योगदान दिले पाहिजे. तेव्हाच खऱ्या अर्थाने “सर्वांगीण विकास” साध्य होईल.@ डॉ ललिता भगत
विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशसह संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध होणाऱ्या "पुरंदर प्राईम न्यूज" या वृत्तपत्र आणि न्यूज चॅनलसाठी जिल्हा, तालुका, शहर आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे आहेत. संपर्क, मुख्यसंपादक/ बापू राजाराम मुळीक, मो,9923070749.....( नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल...👉 वाट्सप नंबर,8483836284
0 Comments