Hot Posts

6/recent/ticker-posts

कोडीत ते मरीआई मंदिर रस्त्यावरील जीवघेण्या खड्ड्यांविरोधात उद्या उपोषण ! सासवड प्रतिनिधी : बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: कोडीत ते मरीआई मंदिर (सासवड–हिवरे रोड) या अत्यंत वर्दळीच्या रस्त्यावर गेल्या अनेक दिवसांपासून मोठमोठे व जीवघेणे खड्डे पडले असून,या खड्ड्यांमुळे नागरिकांचे जीव धोक्यात आले आहेत. मात्र, वारंवार तक्रारी, निवेदने व सूचना देऊनही सार्वजनिक बांधकाम विभागाकडून रस्त्याच्या दुरुस्तीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याचा गंभीर आरोप करण्यात येत आहे.प्रशासनाच्या या बेपर्वाईविरोधात उद्या,गुरुवार दि. १८ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालय, सासवड येथे जाहीर उपोषण करण्यात येणार असल्याचे पुरंदर तालुका महावितरण समन्वयक योगेश खुटवड यांनी सांगितले.सदर रस्ता हा कोडीत परिसरातील ग्रामस्थ,शेतकरी, विद्यार्थी तसेच गराडे मार्गे मरीआई घाटातून खेड शिवापूरकडे जाणाऱ्या परिसरातील वाहनधारक, प्रवासी,नोकरदार,शेतकरी,विद्यार्थी,व्यावसायिक व भाविकांसाठी अत्यंत महत्त्वाचा असताना, रस्त्याची अवस्था अक्षरशः खड्डेमय झाली आहे.दुचाकी घसरून पडणे,चारचाकी वाहनांचे नुकसान होणे,अपघात घडणे अशा घटना सातत्याने घडत आहेत. नागरिकांच्या जीवाशी खेळ करणाऱ्या या निष्क्रियतेचा निषेध म्हणून उपोषणाचा मार्ग स्वीकारावा लागत असल्याचे योगेश खुटवड यांनी स्पष्ट केले.रस्त्याची तातडीने दुरुस्ती न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, तसेच संबंधित अधिकाऱ्यांना थेट जबाबदार धरले जाईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला आहे.

Post a Comment

0 Comments