जेजुरी गडाच्या पूर्व बाजूच्या पायरी मार्गावर बैल उधळल्याने गोंधळसीसीटीव्हीत घटना कैद; भाविकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ? सासवड प्रतिनिधी:बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: (दि-०८) - महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या प्रसिद्ध श्री खंडोबा गडाच्या पूर्व बाजूला असलेल्या जुनी जेजुरी येथील पायरी मार्गावर रविवारी (दि.८ फेब्रुवारी २०२६) सकाळी घडलेल्या एका घटनेमुळे काही काळ गोंधळाचे व तणावाचे वातावरण निर्माण झाले.काही बैलगाडा शर्यतीचे शौकीन आपल्या शर्यतीचे बैल खंडोबा देवाच्या दर्शनासाठी जेजुरी येथे घेऊन आले होते. सुरुवातीला भाविकांनी बैलजोडी गडावर जाणाऱ्या आपत्कालीन (इमर्जन्सी) गेटवर आणली. त्यावेळी देवस्थानचे कर्मचारी चंद्रकांत घाडगे यांनी गडावर कोणतेही मुके जनावर नेण्यास बंदी असल्याचे स्पष्ट सांगत बैलजोडी गडावर नेण्यास नकार दिला.मात्र त्यानंतर संबंधित भाविकांनी गडावर जाण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या दुसऱ्या मार्गाचा अवलंब करत गडाच्या पूर्व बाजूच्या जुनी जेजुरी येथील पायरी मार्गाने बैलजोडी पुढे नेली.सकाळी पावणे अकराच्या सुमारास दर्शनासाठी पायऱ्यांवरून बैलांना नेत असताना गर्दीमुळे अचानक दोन बैल घाबरून उधळले.या प्रकारामुळे पायरी मार्गावर उभ्या असलेल्या भाविकांमध्ये एकच पळापळ उडाली. या गोंधळात तीन महिलांना बैलांची धडक बसल्याची माहिती मिळाली आहे. सुदैवाने मोठी जीवितहानी टळली असली, तरी काही काळ परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. हा संपूर्ण प्रकार पायरी मार्गावरील दुकानाच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून, फुटेजमध्ये बैल उधळल्यानंतर भाविकांची झालेली धावपळ स्पष्टपणे दिसून येते. घटनेनंतर काही काळ तणावाचे वातावरण होते, मात्र नंतर परिस्थिती सुरळीत झाली.विशेष म्हणजे, गडावर जनावरांना स्पष्ट बंदी असतानाही गडाकडे जाणाऱ्या पायरी मार्गावर बैल नेण्यात आले. त्यामुळे गर्दीच्या पायरी मार्गावर बैल नेणाऱ्यांवर कारवाई होणार का? देवस्थानचे विश्वस्त मंडळ याबाबत काय भूमिका घेणार? असे प्रश्न उपस्थित होत आहेत.दररोज हजारो भाविक दर्शनासाठी येत असताना गडाकडे जाणाऱ्या पायरी मार्गावरील सुरक्षिततेबाबत ठोस नियोजनाचा अभाव या घटनेतून पुन्हा एकदा समोर आला आहे.“जेजुरीत भाविक खरोखर सुरक्षित आहेत का ?”हा प्रश्न आता नागरिक व भाविकांमधून उपस्थित होत आहे.या घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, तसेच भविष्यात गडाकडे जाणाऱ्या सर्व मार्गांवर कडक नियंत्रण व नियोजन राबवावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. पदसिद्ध विश्वस्त असलेले पुरंदर तालुक्याचे तहसिलदार विक्रम राजपूत आणि पदसिद्ध विश्वस्त जेजुरीचे विद्यमान नगराध्यक्ष जयदीप बारभाई यांनी या प्रकरणात तातडीने लक्ष घालावे, अशीही अपेक्षा व्यक्त केली जात आहे.गडावर बंदी असताना पायरी मार्गावरून नियमभंग झाला असेल, तर जबाबदारी निश्चित करून कारवाई होणे आवश्यक असल्याची ठाम मागणी होत आहे.
विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशसह संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध होणाऱ्या "पुरंदर प्राईम न्यूज" या वृत्तपत्र आणि न्यूज चॅनलसाठी जिल्हा, तालुका, शहर आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे आहेत. संपर्क, मुख्यसंपादक/ बापू राजाराम मुळीक, मो,9923070749.....( नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल...👉 वाट्सप नंबर,8483836284
0 Comments