Hot Posts

6/recent/ticker-posts

सासवड नगरपरिषदेचा ३९२ कोटींचा अर्थसंकल्प मंजूर... कोणताही करवाढ नाही.. ​सासवड प्रतिनिधी : बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: सासवड शहराच्या सर्वांगीण विकासाची नवी दिशा स्पष्ट करणारा आणि सर्वसामान्यांच्या खिशाला कोणताही फटका न देणारा सासवड नगरपरिषदेचा सन २०२६-२७ या वित्तीय वर्षाचा अर्थसंकल्प शुक्रवारी (ता. २७) मंजूर करण्यात आला. नगराध्यक्षा आनंदीकाकी जगताप यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या विशेष सर्वसाधारण सभेत ३९२ कोटी ६५ लाख रुपयांच्या खर्चाला सर्वानुमते मंजुरी देण्यात आली. खेळीमेळीच्या वातावरणात ही सभा संपन्न झाल्याचे मुख्याधिकारी डॉ. कैलास चव्हाण यांनी सांगितले. ​या अर्थसंकल्पात प्रशासनाने कोणतीही कर वाढ सुचवलेली नाही. सन २०२६-२७ मध्ये नगरपरिषदेला महसुली आणि भांडवली अशा दोन्ही स्वरूपात मिळून एकूण ४२६ कोटी १४ लाख रुपयांची जमा अपेक्षित धरण्यात आली आहे. तर दुसरीकडे, शहराच्या विकासासाठी आणि प्रशासकीय कामांसाठी ३९२ कोटी ६५ लाख रुपये खर्च होणार असल्याचे नियोजित करण्यात आले आहे. या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून सासवड शहराच्या सौंदर्यीकरणासोबतच पायाभूत सुविधांच्या सक्षमीकरणावर मोठा भर दिला जाणार असल्याचे मुख्याधिकारी डॉ. कैलास चव्हाण यांनी सांगितले. ​नागरिकांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांना या अर्थसंकल्पातून न्याय देण्यात आला आहे. यामध्ये प्रामुख्याने नवीन पाणीपुरवठा योजना, नागरिकांच्या विरंगुळ्यासाठी नमो उद्यान, सांडपाणी व्यवस्थापनासाठी 'भुयारी गटर २' आणि पर्यावरण संवर्धनासाठी 'माझी वसुंधरा' यांसारख्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांचा समावेश आहे. केवळ भौतिक सुविधाच नव्हे, तर सामाजिक बांधिलकी जपत शासन नियमाप्रमाणे दिव्यांग कल्याण, महिला व बालकल्याण आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या सक्षमीकरणासाठी प्रत्येकी पाच टक्के निधीची विशेष तरतूद करण्यात आली आहे.​सभेच्या कामकाजादरम्यान नगराध्यक्षा आनंदीकाकी जगताप यांच्यासह सर्व उपस्थित नगरसेवक आणि नगरसेविकांनी शहराच्या प्रलंबित कामांबाबत आणि भविष्यातील नियोजनाबाबत सविस्तर चर्चा केली. सभेच्या शेवटी नगराध्यक्षांनी या अर्थसंकल्पाचे स्वागत करत सर्वांचे आभार मानले. यावेळी मुख्याधिकारी डॉ. कैलास चव्हाण यांनी प्रशासनाच्या वतीने आभार व्यक्त केले. या विशेष सभेला सर्व नगरसेवक, विविध विभागांचे प्रमुख आणि नगरपरिषदेचे कर्मचारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments