सासवड येथील वाघीरे विद्यालयास पंचतारांकित हरित शाळा पुरस्कार सासवड प्रतिनिधी : बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: राष्ट्रीय हरित सेना योजने अंतर्गत, पुणे जिल्ह्यात २५० माध्यमिक शाळामध्ये इको-क्लब स्थापन करण्यात आलेले आहेत. या वर्षात पर्यावरणविषयक उपक्रम कशा प्रकारे राबविले त्याबाबत शाळांची तपासणी करुन उत्कृष्ट काम केलेल्या शाळांना सामाजिक वनीकरण विभाग महाराष्ट्र शासन यांचे वतीने पंचताराकित हरित शाळा पुरस्कार देण्यात येतात. पुणे विभागस्तरीय पुरस्कारासाठी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे वाघीरे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, सासवड या शाळेची निवड करण्यात आली होती. दिनांक २६ जानेवारी २०२६ रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त विभागीय वन अधिकारी, सामाजिक वनीकरण विभाग, वानवडी, पुणे येथे झालेल्या ध्वजवंदना नंतरच्या कार्यक्रमात विवेक खांडेकर प्रधान मुख्य वनसंरक्षक, सामाजिक वनीकरण, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या शुभहस्ते वाघीरे विद्यालयास पुणे विभागस्तरीय पंचताराकित हरित शाळा उत्तेजनार्थ पारितोषिकाचे वितरण करण्यात आले. यावेळी वाघीरे विद्यालयातील राष्ट्रीय हरित सेनेचे समन्वयक शिक्षक शिवहार लहाने, विद्यार्थी कार्तिक हिप्परकर व विद्यार्थिनी अनुप्रिया पाडळकर उपस्थित होते. शालेय विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाविषयी जागृतता निर्माण करणारा एक महत्त्वाचा उपक्रम आहे. महाराष्ट्र सामाजिक वनीकरण विभागामार्फत चालवल्या जाणाऱ्या या उपक्रमात, विद्यार्थी निसर्ग अभ्यास शिबिरे, वृक्षारोपण, प्लास्टिक मुक्ती आणि जलसंधारण यांसारख्या प्रत्यक्ष कृतींद्वारे पर्यावरण संरक्षणाचे धडे शिकतात. विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाविषयी संवेदनशीलता आणि जबाबदारीची भावना निर्माण होते. वाघीरे विद्यालयात राष्ट्रीय हरित सेनेच्या माध्यमातून पर्यावरण विषयक विविध उपक्रम राबविले जातात. सासवड वनपरिक्षेत्र अधिकारी सामाजिक वनीकरण तसेच विद्यालयाच्या मुख्याध्यापिका पूजा जोग, उपमुख्याध्यापक शंतनू सुरवसे, पर्यवेक्षिका अर्चना लडकत यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय हरित सेनेचे कामकाज शाळेत केले जाते. या पुरस्काराबद्दल शाळा समितीचे अध्यक्ष राहुल मिरासदार, महामात्र सुधीर भोसले यांनी कौतुक केले आहे.
विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशसह संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध होणाऱ्या "पुरंदर प्राईम न्यूज" या वृत्तपत्र आणि न्यूज चॅनलसाठी जिल्हा, तालुका, शहर आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे आहेत. संपर्क, मुख्यसंपादक/ बापू राजाराम मुळीक, मो,9923070749.....( नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल...👉 वाट्सप नंबर,8483836284
0 Comments