Hot Posts

6/recent/ticker-posts

सासवड येथे एनएसएस विशेष हिवाळी शिबिर उत्साहात संपन्न सासवड : बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: पुणे जिल्हा शिक्षण संस्थेच्या सेठ गोविंद रघुनाथ साबळे कॉलेज ऑफ फार्मसी, सासवड येथील राष्ट्रीय सेवा योजना (एन एस एस) विभागाच्या वतीने १८ ते २४ जानेवारी २०२६ या कालावधीत सुपे खुर्द, ता. पुरंदर, जि. पुणे येथे विशेष हिवाळी शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले. हे शिबिर राष्ट्रीय सेवा योजना – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या सहकार्याने राबविण्यात आले.“युवक, पाणलोट क्षेत्र व्यवस्थापन व पडीक जमिनीचा विकास – शाश्वत विकासासाठी” या विषयावर आधारित या सात दिवसीय शिबिरात एकूण ५० स्वयंसेवकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. शिबिरादरम्यान स्वच्छता मोहीम, वृक्षारोपण, प्लास्टिक संकलन, जलसाक्षरता, आरोग्य तपासणी, औषधांविषयी जनजागृती, विविध सर्वेक्षणे, पथनाट्य व ग्रामजागृती उपक्रम राबविण्यात आले.शिबिराच्या पहिल्या दिवशी गाव परिसर स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. दुसऱ्या दिवशी शिबिराचे उद्घाटन संपन्न झाले. तिसऱ्या दिवशी बजाज पुणे ग्रँड सायकल टूर २०२६ निमित्त प्लास्टिक संकलन मोहीम राबविण्यात आली. चौथ्या दिवशी कालबाह्य औषधांचे दुष्परिणाम, योग्य औषधवापर व प्लास्टिक कचरा व्यवस्थापन याविषयी घरोघरी सर्वेक्षण व प्रभावी पथनाट्य सादर करण्यात आले. पाचव्या दिवशी स्वयंसेवकांनी बजाज पुणे ग्रँड सायकल टूर २०२६ दरम्यान स्वयंसेवक म्हणून सेवा बजावली.सहाव्या दिवशी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले तसेच ग्रामस्थ व स्वयंसेवकांसाठी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. शेवटच्या दिवशी शिबिराचा समारोप सोहळा पार पडला. यावेळी स्वयंसेवकांनी आपले अनुभव व्यक्त केले आणि पुन्हा एकदा स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.शिबिरादरम्यान योग, जलसाक्षरता, ग्रामविकास, महिलांचे स्वसंरक्षण, उद्योजकता व कृषी प्रक्रिया उद्योग या विषयांवर विविध मान्यवरांनी मार्गदर्शन केले. या शिबिरामुळे विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीव, नेतृत्वगुण, शिस्त आणि ग्रामीण जीवनाचा प्रत्यक्ष अनुभव निर्माण झाला.या शिबिराचे समन्वयक म्हणून प्रा. सुमित मुसळे, प्रा. हनुमंत पाटील व प्रा. प्रशांत गायकवाड यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. संपूर्ण शिबिराचे आयोजन महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. राजश्री चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी प्राध्यापकवर्ग, कर्मचारी, स्वयंसेवक तसेच सुपे खुर्द गावातील ग्रामस्थांनी सहकार्य केले.

Post a Comment

0 Comments